nagar | बळीराजा सुखावला ; दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

नगर, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. परंतु, सोमवारी सायंकाळी व रात्री झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले, असून बळीराजा सुखावला आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी २४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यात सहा ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
जामखेड ९३.५, मिरजगाव ८० , खर्डा ९२.३, नायगाव ९३.५, माणिकदौंडी ११७, टाकळी ६६.३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नगर, पारनेर, जामखेड, राहुरी, शेवगाव, कर्जत, पाथर्डी तालुक्यात भिज पाऊस झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने दोन दिवस रेड आलर्टचा इशारा देखील दिला आहे. आज पुन्हा सायंकाळी नगर शहरासह तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला होता. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली.
तसेच शेतकर्यांनी खरीपाची पेरणीही मोठ्या प्रमाणात केली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दडी मारली. तब्बल १५ दिवस पावसाने उसंत दिली. त्यामुळे पिकांनीही माना टाकल्याने शेतकर्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. परंतु, सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
माणिकदौंडी परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद
जिल्ह्यातील मिरजगाव ८० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जामखेड ९३.५, खर्डा ९२.३, नायगाव ९३.५, माणिकदौंडी ११७ , टाकळी ६६.३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नगर तालुका पारनेर, जामखेड, राहुरी, शेवगाव, कर्जत, पाथर्डी तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
तालुकानिहाय पाऊस (मि.मी)
नगर २३.५ (मि.मी)., पारनेर १२.४, श्रीगोंदा ३१.८, कर्जत २९.५, जामखेड ७७, शेवगाव १२.८, पाथर्डी ५५.९, नेवासा २१.१, राहुरी १५.२, संगमनेर १५, अकोले १७.८, कोपरगाव १०.२, श्रीरापूर १४.३, राहाता १३ मिलीमिटर पाऊसांची नोंद करण्यात आली आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यात दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शयता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये, विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅटर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात पावसाची हजेरी
मुख्य बाजारपेठेसह सावेडी, केडगाव व भिंगार उपनगरांमध्ये पुन्हा मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. गेले तीन ते चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने नगरकर सुखावले. मंगळवार दुपारी५ ते सव्वापाच वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस सुरु होता.
मुख्य बाजारपेठ व सिव्हिल हडको परिसरात पाऊस झाल्याने काही वेळातच रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले. मिस्किन मळा परिसरातील रोडवरही पावसाचे पाणी वहात होते. मुख्य शहरातून सावेडी उपनगराकडे पावसाने आगेकूच केली.दरम्यान, पावसाची हजेरी लागताच सिव्हिल हडको, सावेडी उपनगराचा काही भाग, नंदनवन कॉलनी, भिस्तबाग परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला.





