मुळशीतील बळीराजा संभ्रमावस्थेत

पौड – गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आतील जमीन मालकांना बिनशेती (एनए) परवानगीची आवश्यकता असणार नाही. फक्त जमीन मालकांनी “एनए’ करभरल्यानंतर त्यांना सनद मिळणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो जागा मालकांना फायदा होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तरी शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती माहिती मिळाली नसल्याने मुळशी तालुक्यातील बळीराजा संभ्रमावस्थेत आहे.
गावठाणापासून 200 मीटर परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनसाठी वाटप केलेल्या क्षेत्रांतील जमीन अकृषिक करून घेता येणार आहे. यासाठी महसूल भरावा लागणार आहे. यासंदर्भाने तलाठी यांच्याकडून या अकृषिक आकारणीची नोटीस प्राप्त करून घ्यावी. नमुद रक्कम शासन जमा केल्यानंतर, शासन निर्णयातील विहित नमुन्यातील सनद तहसीलदार कार्यालयामार्फत संबंधित खातेदारांना प्रदान करण्यात येणार आहे. या सनदीद्वारे आपले क्षेत्र अकृषिक झाल्याचे समजण्यात येणार आहे.
मुळशी तालुक्यातील सर्व (गावठाणापासून 200 मीटरच्या आतील) नागरिक खातेदारांनी आपली जमीन अकृषिक करण्याची किचकट प्रक्रिया टाळून शासनाच्या या सुलभ योजनेचा लाभ घेणेसाठी आपल्या तलाठी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा.
– अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी
गावठाणांच्या हद्दीलगत असलेली कोणते गट येतात याची माहिती तलाठीमार्फत गावात दवंडी करण्यात यावी अथवा प्रसिद्ध करण्यात यावी त्यासाठी शासनाने कालावधी वाढून देणे गरजेचे आहे. जनजागृती करून शेतकऱ्यांना एनएसंदर्भातील फायदा तोटा याची माहिती नसल्याने लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.
– विनायक ठोंबरे, अध्यक्ष, भाजपा, मुळशी
ग्रामीण भागातील 200 मीटर अंतरावरील जमीन अकृषिक (एन.ए.) करण्याचा निर्णय तब्बल आठ महिन्यांपूर्वी घेण्यात आला. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती शेतकऱ्यांना दिली नाही. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांशी पत्रव्यवहार करून चर्चा करणार आहे. प्रशासनाच्या विलंबाचा फटका शेतकऱ्यानी का सहन करायचा?
– सोपान निबुदे, सहकार आघाडी, भाजपा
आमची वाळेन गावठाण लागून शेती आहे. एनए केल्यानंतर आम्हाला त्या जागेत शेतीच करावी लागणार आहे. दरवर्षी पेक्षा अधिक शेतसारा भरावा लागणार आहे. त्या जागेत कोणतीही विकसन होणार नाही. त्यामुळे शेतीच बरी.
– शंकर साठे, शेतकरी





