संगमनेर : नुकताच हरियाणा विधानसभेचा निकाल लागला. या ठिकाणी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले व काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हरियाणामध्ये आमच्याच गोंधळामुळे पक्षाचा पराभव झाला अशी जाहीर कबुली दिली आहे. काय म्हणाले बाळासाहेब थोरात? हरियाणाच्या निकालानंतर राज्यात काहीजणांना फार आनंद झाला आहे. मात्र हरियाणात आम्हीच गोंधळ घातला होता, अशी स्पष्ट कबुली काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलीय. तसेच इथं काही गोंधळ नाहीये, त्यामुळे राज्यातून भ्रष्ट महायुतीचे सरकार जाणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हरियाणात भाजपमुळे नाही तर काँग्रेसच्या गोंधळामुळेच पराभव झाल्याचे थोरातांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सत्तेवर येईल महाराष्ट्रात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित काम करत असून 180 पेक्षा जास्त जागा जिंकत महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा दावादेखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.