‘बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड यातना होत असतील’; असं का म्हणाल्या स्मिता ठाकरे

Smita Thackeray -शिवसेनेची सध्याची अवस्था पाहून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड यातना होत असतील, असा दावा बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केला आहे.
राज व उद्धव ठाकरे यांच्या वाटा एकमेकांपासून वेगळ्या होत होत्या तेव्हा मी त्या दोघांनाही खूप समजावून सांगितले. पण फायदा झाला नाही. काही गोष्टी खूप खोलवर गेल्या असतात. त्या कायम मनात राहतात, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
स्मिता ठाकरे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज व उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध, शिवसेनेची सद्यस्थिती आदी विविध मुद्यांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेची २ शकले पडली. शिवसेनेची ही अवस्था पाहून बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला प्रचंड यातना होत असतील.
राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या वाटा वेगळ्या होण्याची अनेक कारणे आहेत. अनेकदा काहींचे आम्हीच वारसदार असल्याचे म्हणणे असते. त्यामुळे ही वृत्ती एकदा कुणाच्या डोक्यात गेली की, त्याच्या मनात इतर लोकांचे महत्त्व राहत नाही. अशा वृत्तीने कुणी पक्ष चालवणार असेल तर पक्षही एकसंध राहत नाही, असेही स्मिता म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द दिला होता. त्यांनी माझे काम पाहिले होते. पण नंतर तसे काहीच घडले नाही. हे कशामुळे घडले, त्यामागे कोण होते हे मी सांगणार नाही. पण आतून सर्वांनाच मी राजकारणात यावे असे वाटत होते. काही गोष्टी अधोरेखित असतात, असेही स्मिता ठाकरे अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हणाल्या.
बाळासाहेबांकडून खूप काही शिकले
माँ मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरे खूप भावनिक झाले होते. त्यावेळी मी त्यांसोबतच होते. उद्धव ठाकरे व बाळासाहेबांत काय झाले माहिती नाही. मी व बाळासाहेब याविषयी केव्हा बोललोही नाही. मी कायम त्यांच्याकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकले. माझे व त्यांचे गुरू शिष्याचे नाते होते. मी आज जे काही शिकले ते केवळ बाळासाहेबांमु्ळेच शिकले, असेही स्मिता ठाकरे यावेळी बोलताना म्हणाल्या.




