Baipan Bhari Deva Re -release: सध्या हिंदी चित्रपटांच्या री-रिलीजचा ट्रेंड सुरू आहे. अद्याप एकही मराठी चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर रिलीज झाला नव्हता. मात्र आता मराठी प्रेक्षकांना लवकरच लोकप्रिय चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमागृहात पाहता येणार आहे. 2023 मध्ये रिलीज झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी देखील एक होता. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी हा चित्रपट थिएटरमध्ये री-रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज निर्मित व बेला शिंदे-अजित भुरेंची सह-निर्मिती आहे. पुन्हा रिलीज होणारा ‘बाईपण भारी देवा’ पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. चित्रपटाच्या री-रिलीज तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट 7 मार्च 2025 रोजी पुन्हा मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी ‘बाईपण भारी देवा’ 30 जून 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला होता. रिलीजनंतर पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने 12.5 कोटी रुपयांची कमाई करण्याची कामगिरी केली होती. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 76.5 कोटी रुपये होते. हा सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला आहे. आता पुन्हा रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांची आधीसारखीच पसंती मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.