पुणे : मुळशी तालुक्यातील पिरंगुट सावकारवाडी येथे तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणी महेश तानाजी कदम (रा. पिरंगुट) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश रागीट साहेब यांनी जामीन मंजूर केला आहे. त्याने अॅड. अभिषेक हरगणे यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर आरोपीला ५० हजाराच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने हा आदेश दिला. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी बावधन पोलीस स्टेशन येथे या घटनेची एफ आय आर नोंदविण्यात आली होती. पिरंगुट सावकारवाडी येथे मटण पार्टी मध्ये झालेल्या वादावरून पिरंगुट येथे एका तरुणावर गावठी कट्ट्यामधून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात महेश सह एकूण ३ आरोपींविरुद्ध बेकायदा अग्नी शस्त्र बाळगणे, धमकी देणे व खुनाचा प्रयत्न करणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर करण्यात आला. अॅड हरगणे यांच्या सोबत अॅड. ओंकार फडतरे, अॅड.अजिंक्य पोळ, अॅड. कोमल धुमाळ, अॅड. मयूर जमदाडे, अॅड. अयान पानसरे यांनी कामकाज पाहिले.