अखेर जामीन मंजूर; नितेश राणेंना मोठा दिलासा

मुंबई – भाजप आमदार नितेश राणे जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने सुनावणी करत नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नितेश राणेंना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तरी त्यांची जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू होती. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज पुन्हा सुनावणी घेण्यात आली. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यनंतर नितेश यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
आमदार नितेश यांना जामीन अर्ज मंजूर केल्यामुळे नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असून कणकवली तालुक्यात त्यांना येण्यास बंदी घातली आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात. जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरस पोलीस स्टेशनला हजर राहावे लागेल, अशा अटीही घालण्यात आल्या आहेत.





