पुणे – ज्येष्ठ दाम्पत्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला.
जाधव यांनी औंध येथे ज्येष्ठ दाम्पत्याला 14 डिसेंबर रोजी सायंकाळी मारहाण केली होती. याप्रकरणी चतृ:श्रृगी पोलिस ठाण्यात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (भादवी कलम 307) नुसार गुन्हा दाखल करून जाधव यांना अटक केली आहे. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर जाधव यांनी ऍड. जहिरखान पठाण यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सहायक सरकारी वकील व्ही. सी. मुरळीकर यांनी विरोध केला. हा गंभीर गुन्हा असून, जामीन देऊ नये, असा युक्तीवाद ऍड. मुरळीकर यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला.