बदलापूर : बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला फाशी देण्याची मागणी लोकांकडून करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी राज्य शासनाने एसआयटीमार्फत सुरु केली आहे. बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्या दिवशी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची चौकशी त्यांनी सुरु केली आहे.
या चौकशीदरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेविरोधात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा सापडला आहे. शाळेच्या गेटच्या बाहेरच्या सीसीटीव्हीत अक्षय शिंदे शाळेत जाताना आणि येताना आढळून आला आहे. घटनेच्या महिन्याभर आधीपासून शाळेतील सर्व सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही बंद असल्याने तांत्रिक पुरावे जमा करण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.मात्र आता अक्षय विरुद्ध तांत्रिक पुरावा हाती लागल्याने आरोपीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बदलापूरमध्ये घडलेल्या दोन चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अक्षय शिंदेवर आता दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील दुसऱ्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी अक्षय शिंदे यांच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला आहे. सध्या अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.