बडगुजरांचा भाजप प्रवेशाचा निर्णय अन् नितेश राणेंचा यूटर्न; म्हणाले, “आता १०० टक्के भगवाधारी झाले”

Sudhakar Badgujar | शिवसेना (ठाकरे गट) मधून हकालपट्टी झालेल्या सुधार बडगुजरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रवेशाची तयारी दर्शवली होती. आज (17 जून 2025) सकाळी हजारो कार्यकर्त्यांसह ते मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालयात प्रवेशासाठी रवाना झाले आहे. मात्र स्थानिक नेत्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत काहीसा संभ्रम असला तरी सुधाकर बडगुजर आणि त्यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम आहेत.
दुसरीकडे, सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटात असताना भाजपकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतील एकत्र डान्स करतानाचे फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यावेळी विधानसभेत दाखवले होते. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली होती. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच नितेश राणे यांची भूमिका बदलली आहे. Sudhakar Badgujar |
नितेश राणेंकडून बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत
मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत केले आहे. “हिंदुत्त्वाचा धागा घेऊन आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार आहोत. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. बडगुजर यांचा हिंदुत्वाच्या दिशेने जोरदार प्रवास सुरु आहे. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी आम्ही काढलेल्या सकल हिंदुत्व मोर्चात आघाडीवर होता. त्यामुळे आता ते येत असतील तर हरकत नाही,” असे नितेश राणे यांनी म्हटले. Sudhakar Badgujar |
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा वाद
बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत नाचताना दिसणारा व्हिडीओ भाजप मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केला होता. त्यामुळे बडगुजरांना देशद्रोही ठरवण्यात आले होते. आता त्याच पक्षात त्यांचा प्रवेश होण्याच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा :





