Badaun Uttar Pradesh | करोनाला असं रोखणार? उत्तरप्रदेशात मौलवीच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी

बदायूं ( Badaun Uttar Pradesh  ) – उत्तर प्रदेशातील बदायूं  शहरामध्ये रविवारी एका मुस्लिम मौलवीच्या अंत्ययात्रेला हजारो लोकांनी उपस्थिती लावल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशात करोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत असून अशातच अंत्ययात्रेला जमलेली गर्दी पाहता ही घटना करोना सुपरस्प्रेडर ठरते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आता उत्तर प्रदेश पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

अब्दुल हमीद मोहम्मद सलीमुल कादरी असे या मौलवींचे नाव असून त्यांचे रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमधून लोक बदायूं येथे दाखल झाले. मौलवींचे पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी शहरातील मशिदीबाहेर ठेवण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी करोना सुरक्षिततेच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली करत अंतिम दर्शन घेतले. ( Badaun Uttar Pradesh )

याबाबतचा एक व्हिडीओ सध्या समोर आला असून यामध्ये श्वास घ्यायलाही जागा नसेल इतकी प्रचंड गर्दी जमल्याचे चित्र दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी करोनासंबंधित निर्बंधांची पायमल्ली केल्याचा ठपका ठेवत अज्ञातांविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिली.

दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये अंत्ययात्रेसाठी केवळ २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज मास्कचा वापर न केल्यास पहिल्यांदा १ हजार तर दुसऱ्यांदा मास्कविना सापडल्यास १० हजार दंड आकारण्याची तरतूद आहे. ( Badaun Uttar Pradesh )

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.