खराबवाडी ग्रामपंचायतीवर अखेर प्रशासक नियुक्त

विविध प्रकरणांमुळे कायमच गाव चर्चेत
महाळुंगे इंगळे – विविध प्रकरणांमुळे सध्या चर्चेत असलेली उद्योग पंढरीतील खराबवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची नामुष्की ओढवल्याने आता परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. लाच मागितल्या प्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याची झालेली उचलबांगडी.
पदाचा दुरुपयोग केल्याने ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे रद्द झालेले सदस्यत्व, तसेच लाचखोर ग्रामविकास अधिकारी बाळू मलघेने लाच मागितल्या प्रकरणी जबाबदार धरून ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांसह विद्यमान सदस्यांची झालेली चौकशी, पदाचा नियोजित कालावधी पूर्ण झाल्याने सरपंच व उपसरपंचांनी दिलेले राजीनामे, लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या रिक्त झालेल्या जागी नव्याने नेमणूक झालेले नवीन ग्रामविकास अधिकारी व नियोजित सरपंच व उपसरपंच यांची नव्याने नियुक्ती होण्यास झालेला विलंब यामुळे खराबवाडी ग्रामपंचायतीवर अखेर प्रशासक म्हणून खेडचे विस्तार अधिकारी एस.डी. थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एक महिना होऊन देखील सरपंच व उपसरपंच यापैकी कोणाचीच या पदावर नव्याने नियुक्ती झाली नसल्याने खराबवाडी ग्रामपंचायतीवर कोणीच वाली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सह्यांचा अधिकार कोणाला नसल्याने येथील कामे ठप्प आहेत. येथील कार्यकर्ते विश्वनाथ खंडू केसवड यांनी याबाबत खेडचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार अर्जही केला होता. ग्रामस्थांची कामे मार्गी लागावीत, यासाठी जोशी यांनी तातडीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या तरतुदीनुसार आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते तानाजी इसवे यांची नियुक्ती केली.
इसवे यांनी ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच ग्रामस्थांची रेंगाळलेली कामे नियोजनबद्ध रित्या सुरु झाली आहेत. मात्र, सरपंच व उपसरपंच यांची नियुक्ती होण्यास विलंब झाल्याने या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यामुळे खराबवाडी ग्रामपंचायत कायमच चर्चेत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.





