पुणे जिल्हा | भोर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, नागरिक त्रस्त

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महत्त्वाच्या रस्त्यावर मोठमोठे खडडे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून अंदाज न आल्याने अपघात होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने भोर तालुक्यातील भोर मांढरदेवी, भोर वरवडी,भोर शिरवळ,भोर महाड,भोर आंबवडे भोर महुडे,भोर पसुरे-पांगारी, या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
भोर महाड रस्त्यावरील निरानदीवरील आंबेघर येथील दगडी पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पिसावरे फाट्याजवळ, साळेकरवाडी येथे नांदगावजवळ, निगुडघर फाट्याजवळ खड्डे पडले असून म्हसर ओढ्यावरील दगडी पुलावर पाणी साचत आहे. तसेच कोंढरी,हिर्डोशी व वारवंडसह अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
संरक्षक कठडे तुटलेले आहेत.यामुळे रात्र, अपरात्री गाडया दरीत पडण्याचे प्रकार घडत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना पाण्याचा अंदाज येत नसून यातून अपघात घडत आहेत.
भोर महाड रस्त्यावरील कोणत्याही ठिकाणी गटारे काढली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. भोर शिरवळ भोर पसुरे पांगारी भोर,महुडे सदर रस्त्यावरील अनेक ठिकाणी खडडे पडले आहेत यातुनच मार्ग काढत प्रवासी नागरिकांना जावे लागत आहे.





