बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर ; म्हणाले,’…यापुढे सरकारनं आणखी चार जणांना दुखवू नये’

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. आता त्यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस गटाची देखील साथ मिळाली आहे. अजित पवार यांच्या येण्यामुळे सत्तेत असणारे अनेक आमदार नाराज असल्याचे म्हटले जात होते. त्यातच आता लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया देत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराविषयी बोलताना कडू यांनी,’आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन. मी मंत्रिमंडळ विस्ताराला हजर राहणार नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘आता सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करू नये. आता जसं आहे तसं चालू ठेवावं. मंत्रिमंडळ विस्तार करुन विनाकारण चार लोकांना दुखवू नये, असा सल्ला बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सध्या सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता जे मंत्री आहेत ते सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या पुण्यात आहेत. त्यांनी आज पिंपरी-चिंचवड येथील मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते.




