संदीप घिसे
पिंपरी – अनेकजण भाडे जास्त मिळते म्हणून बॅचलर मुलांना आपले घर भाड्याने देतात. मात्र बॅचलर मुलांच्या धांडगधिंग्यामुळे सोसायटीतील इतरांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये बॅचलर भाडेकरूंना “नो-एन्ट्री’ केली आहे. तर काही ठिकाणी फक्त कुटुंबांनाच भाडेकरू म्हणून परवानगी दिली जात आहे. वाकडमधील एका बॅचलर भाडेकरूंना सोसायटीमधील सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने चांगलाच धडा शिकविला.
पिंपरी चिंचवड शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहरात विविध अभ्यासक्रमासाठी नामांकित संस्था सुरू झाल्या आहेत. यामुळे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागातून मुले शिकण्यासाठी येतात. तसेच शिक्षण पूर्ण झालेली मुले येथेच नोकरी करुन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. शिक्षण घेऊन गावी परत जाणाऱ्यांच्या तुलनेत शहरातच स्थायिक होणाऱ्या तरुणांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते. काही संस्थांमध्ये वसतीगृहाची सोय आहे.
मात्र बहुतांश तरुणांना वसतीगृहातील शिस्त नको असल्याने तीन-चार मित्र मिळून एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. यापैकी काही मुले ही श्रीमंत असल्याने त्यांच्या पार्ट्या सुरू असतात. मात्र यापैकी काही मुले रात्री अपरात्री धांगडधिंगा करीत असल्याने सोसायटीतील इतर सदस्यांना त्याचा त्रास होतो. अनेकदा सांगूनही ही मुले ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने काही सोसायट्यांमध्ये बॅचलर भाडेकरूंना मनाई करण्यात आली आहे. भाडेकरू ठेवायचा झाला तर कुटूंबाला फ्लॅट भाड्याने द्यावा, असा नियम काही सोसायट्यांनी केला आहे.
असा होतो बॅचलर भाडेकरूचा त्रास
रात्रीच्यावेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे, दारूच्या पार्ट्या करीत असताना मोठमोठ्याने आवाज करणे, मैत्रिणीसोबत सोसायटीच्या आवारात अश्लिल चाळे करणे, सोसायटीतील इतर सदस्यांना त्रास देण्यासाठी सर्व नळ सुरू ठेवून पाणी संपविणे, अशा प्रकारचे त्रास बॅचलर भाडेकरूकडून दिले जातात. कोणी सांगायला गेले तर त्यांना उलट उत्तरे दिली जातात. आम्ही पैसे देऊन राहतो आहे. तुमची काही तक्रार असेल तर घरमालकाकडे करा, असा सल्लाही दिला जातो. अनेकदा सोसायटीतील मुलींनाही या बॅचलर मुलांकडून त्रास दिला जातो.
वाकडमध्ये बॅचलरांना पोलिसांचा हिसका
रविवारी (दि. 8) रात्री वाकडमधील एका सोसायटीमध्ये अशाच प्रकारे काही बॅचलर मुले धांगडधिंगा घालत होते. या सोसायटीमधील सदस्य आणि पोलीस यांच्यात सुसंवाद असल्याने येथील नागरिकांनी पोलिसांना फोन करून याबाबतची कैफियत मांडली. अवघ्या दहा मिनिटांमध्ये आलेल्या पोलिसांनी धांगडधिंगा घालत असलेल्या “बॅचलर’ मुलांना हिसका दाखविला आणि पोलीस ठाण्यात नेले. या प्रकारामुळे गोंधळ घालणाऱ्यांना एकप्रकारे धडाच शिकविला आहे.
“”सोसायटीने केलेले नियम हे सर्वांना बंधनकारक असतात. यामुळे सोसायटीतील सदस्यांनी तक्रार केल्यावर धांगडधिंगा घालणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवले जाते. त्यांना व त्यांच्या पालकांना समज दिली जाते. त्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने गुन्हा दाखल करीत नाही. मात्र अतिरेक झाल्यास वेळ प्रसंगी पोलीस कायदेशीर कारवाई देखील करतील. बॅचलर मुलांच्या धांगडधिंग्याचा त्रास होत असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी नागरिकांनी संपर्क साधावा.”
– सतीश माने, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे