Bachchu Kadu : आता कर्जमाफीसाठी मशाल आंदोलन करणार; बच्चू कडूंनी केले जाहीर

नाशिक : शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर उद्या रात्री (११ एप्रिल) मशाल पेटवून बच्चू कडू आंदोलन करणार आहेत. दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. सरकारने निवडणुकीमध्ये शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु शेतक-यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतक-यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतक-यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्या विरोधात आम्ही आंदोलन करू, असे कडू म्हणाले. शेतक-यांचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. महायुतीत ते गेल्यावेळी मंत्री होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळा घरोबा केला. विधानसभेत त्यांना आमदारकी टिकवता आली नाही. तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा भूमिका घेताना दिसतात. सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.





