शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात; आजपासून 7/12 कोरा यात्रेला सुरुवात

Bacchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 7/12 कोरा यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. ही सात दिवसांची पदयात्रा 138 किलोमीटरचे अंतर पायी पार पडणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. तर दोनद, उंबर्डा बाजार, लोही, तरणोडी, मानकी, तळेगाव, दारव्हा, वळसा, लाखखिंड, तिवरी, चिरकूटा, तूपटाकळी, वसंतनगर, काळी दौलत, माळकिन्ही, गुंज या गावांमधून ही पदयात्रा जाणार आहे. तर १४ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या ठिकाणी देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप होणार आहे.
बच्चू कडू यांनी सांगितले की, “विधानसभेच्या अधिवेशनात अनेक मंत्र्यांच्या बैठका झाल्या, परंतु कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही. शासनाचा ठोस निर्णय न झाल्याने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि आंदोलनाची तीव्रता कायम राहावी, यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. Bacchu Kadu |
मत कोणालाही द्या, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक व्हा
बच्चू कडू यांनी पुढे म्हटले, “गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात नोंदवल्या गेल्या आहेत. आम्ही आता जाती, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र येण्याचे आणि कर्जमाफीसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मत कोणालाही द्या, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक व्हा, असेही त्यांनी यावेळी सांगितले . Bacchu Kadu |
दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या महिन्यात आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले, पण अजूनही ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
हेही वाचा:
“एलॉन मस्कची गाडी रुळावरून खाली घसरलीय…” ; पक्षाच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्पचा मस्कला टोमणा





