अमरावती : संतोष देशमुख प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, मला असे वाटते की एकंदरीत एवढी निर्घृण हत्या झाली आणि एवढे सगळे होऊन राजकारणी लोकांनी त्यावर राजकारण केले आहे. खरे तर हा दोन जातीतला वाद नसून ही प्रवृत्ती आहे. ज्या प्रमाणे संतोष देशमुखची हत्या झाली ती कशा प्रकारे झाली? ते कुठल्या प्रवृत्तीचे लोक होते? त्यांची जात कोणती होती? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांची जी प्रवृत्ती होती ती फार मला असे वाटते एखाद्या दुश्मनाच्याही म्हणजे औरंगजेबानेही केले नसेल असे कृत्य करून ठेवले आहे. कडू पुढे म्हणाले, अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी तुम्हाला इतकी वर्ष लागतात. ती प्रवृत्ती वाढली कशी? कोणी खतपाणी घातले? ही जबाबदारी तिथल्या पोलिस प्रशासनाची नाही का? हे सगळे कसे आहे डोंगर मोठा झाल्यानंतर आता तुम्ही उंदराची चाल चलत आहात. वास्तविक याच्यामध्ये हे सगळे हत्या झाली म्हणून उघडकीस आले. मग एकंदरीत चालू काय होते बीडमध्ये? कोणाच्या आशिर्वादाने चालू होते? राजकारण म्हणजे सगळेच काही असे समजणारे जे लोक आहेत आणि राजकारणासाठी काही पण, कुठे पण आणि कसे पण करण्याची जी प्रवृत्ती आहे या देशामधील लोकांमध्ये वाढली आहे त्याचे हे मोठे उदाहरण आहे. धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले. या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते. त्यानंतर आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. काय आहे नेमके प्रकरण? मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी सीआयडीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपत्रात मृत संतोष देशमुख यांची कशाप्रकारे हत्या केली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली.