अमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया!’ म्हणताना या वर्षी एक ‘माणूसपणाची माळ’ आपल्या हृदयाला घालू या. शेतकऱ्यांच्या वेदनांचा जागर करू या. आपल्या सणातून एखाद्या घरात उजेड आणू या. हीच खरी समाजसेवा, हीच खऱ्या गणेशभक्तीची परिभाषा आहे. गणपतीच्या देखाव्यातून सरकारला प्रश्न विचारा. आज संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा तुम्ही आवाज व्हा, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातल्या गणेशभक्तांना केले आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई नव्हे, तो शेतकऱ्याच्या डोळ्यातला अश्रू पुसणेही असावे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही, ती एका घराची, एका पिढीच्या भवितव्याची राख झालेली कहाणी आहे. महाराष्ट्रात सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नी, मुले आणि वृद्ध आईवडील यांच्यासाठी गणेश मंडळाचे देखावे व मंडळांच्या दानपेट्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबासाठी आशेचा दीप लावू शकतात. यंदाचे देखावे केवळ सजावटीसाठी नव्हे, तर सजगतेसाठी असतील, कष्टकरी शेतकरी व शेतमजुरांचा जीवनपट मांडणारे असावे, हे महाराष्ट्रातील गणेशमंडळांनी हे ठरवायला हवे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.