शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक; महाराष्ट्र्भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

Bacchu Kadu | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. आता बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
येत्या 24 जुलैला राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दिव्यांग तसेच प्रहार संघटनेसह विविध संस्था कडू यांच्याबरोबर आंदोलनात उतरणार आहेत. कर्जमाफीवर तोडगा निघत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारकडून असमाधानकारक उत्तर
कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीतून कोणताही अर्थबोध झालेला नाही. कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारकडून असमाधानकारक उत्तर दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे.
महायुती सरकारने सत्तेवर येण्याआधी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयात विविध योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार होती. मात्र महायुती सरकार त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याची तातडीने सोडवणूक करावी अशी मागणी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. Bacchu Kadu |
दिव्यांग आणि निराधार महिलांच्या प्रश्नांबाबत प्रहार संघटना आक्रमक आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्यभरातील विविध संघटना आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी कडू यांना या आधीच पाठिंबा जाहीर केला होता. यातच आता बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने महायुती सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे. Bacchu Kadu |
हेही वाचा:





