Bachchu Kadu : बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप प्रसंगी जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अंबोडा येथे जाहीर सभा झाली. यावेळी जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे जवळपास तीन तास असंख्य वाहने रस्त्यावर अडकून पडली आणि वाहनधारकांची, प्रवाशांची गैरसोय झाली.
बच्चू कडू आणि त्यांच्या १२ साथीदारांवर महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महागाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात-बारा कोरा पदयात्रा अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात घेण्यात आली. सोमवारी या यात्रेचा समारोप महागाव तालुक्यातील आंबोडा गावातील श्री गजानन महाराज मंदिरात होणार होता.
त्या ठिकाणी सभेची सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी ऐनवेळी या सभेचे नियोजन रद्द करून जाहीर सभा थेट नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उडाणपुलावरच भरवली. महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. या प्रकारामुळे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्यासह १२ जणांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.





