“बेबी, तू आला नाहीस”; शहीद पायलटच्या अंत्ययात्रेदरम्यान प्रेयसी भावूक

Jaguar crash in Gujrat | गुजरातमधील जामनगरमध्ये बुधवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या जग्वार लढाऊ विमानाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत एका 28 वर्षीय वैमानिकाचा मृत्यू झाला होता. शहीद फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव असे त्यांचे नाव होते.
हरियाणाच्या रेवाडी येथील मूळ गावी भालखी माजरा येथे शुक्रवारी त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. धक्कादायक म्हणजे सिद्धार्थ यांचा २३ मार्च रोजी दिल्लीतील एका मुलीबरोबर साखरपुडा पार पडला होता, इतकेच नाही तर येत्या काही दिवसात या दोघांचे लग्न देखील होणार होते.
सिद्धार्थ यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांची होणारी पत्नी सानियाही पोहोचली होती. सिद्धार्थचं पार्थिव पाहिल्यानंतर तिला अश्रू अनावर होत होते. मृतदेहाकडे पाहून ती म्हणाली, “बेबी, तू मला घ्यायला आला नाहीस. तू येशील असं म्हणाला होतास.” मृतदेहाकडे पाहत सानिया पुन्हा पुन्हा म्हणत होती, “कृपया मला एकदा त्याचा चेहरा दाखवा.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Gurutva Rajput 🇮🇳 (@GurutvaR) April 4, 2025
नेमकं काय घडलं होत?
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, जामनगर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच म्हणजेच बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दोन वैमानिक असलेले हे विमान कोसळले. जामनगर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर सुवर्दा गावाजवळ एका रिकाम्या जागेत हे विमान कोसळले आणि त्याला आग लागली.
या दुर्घटनेत एक वैमानिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या मोहिमेदरम्यान वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला आणि ते दोघे विमानातून बाहेर पडले, अशी माहिती भारतीय हवाई दलाने एका निवेदनात दिली होती.
यादव यांची चौथी पिढी भारतीय हवाई दलात
सिद्धार्थ यांनी 2016 मध्ये एनडीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण घेतले आणि नंतर फायटर पायलट बनले. दोन वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी फ्लाइट लेफ्टनंटची रँक प्राप्त केली. सिद्धार्थ यांचे वडील सुशील कुमार आयएएफमधून निवृत्त झाले होते तर त्याचे आजोबा रघुबीर सिंग तसेच पणजोबा देखील भारतीय सैन्यात होते. त्यांची चौथी पिढी भारतीय हवाई दलात सेवा देत होती.
सिद्धार्थचे वडील भावुक
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर वडील सुजित यादव म्हणाले की, “सिद्धार्थचे नेहमीच विमान उडवून देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. तो अभ्यासातही हुशार होता. माझे वडील आणि आजोबाही सैन्यात होते. मी स्वतः हवाई दलात राहिलो आहे. याचा आम्हाला नेहमीच अभिमान होता आणि आजही आहे. मला सांगण्यात आलं की सिद्धार्थ शेवटच्या क्षणी पॅराशूटने उडी मारू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही कारण खाली सामान्य लोक होते. स्वतःच्या जीवाची चिंता न करता, त्याने लोकांचे जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.”
दरम्यान आयएएफने त्यांच्या निवेदनात सिद्धार्थ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून आपण कुटुंबियांबरोबर असल्याचे म्हटले आहे. तसेच या अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा :





