Baburao Walekar on Jarange। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येतंय. त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांनी मला ठार करण्याचा डाव आखला आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यातच आता मनोज जरांगे यांच्यावर आणि त्यांनी केलेल्या आंदोलनावर गंभीर आरोप करण्यात आलेत.
मनोज जरांगें समाजाची दिशाभूल करतोय Baburao Walekar on Jarange।
मनोज जरांगे यांचे सहकारी बाबूराव वाळेकर यांनी हे आरोप केलेत. ” मनोज जरांगेंसोबत मी १७ ते १८ वर्षांपासून काम करतो आहे. हा माणूस समाजाची दिशाभूल करतोय. २०११ ला त्यांनी एक संघटना उघडली. मी त्या संघटनेत होतो. कोपर्डी बलात्काराची घटना घडली त्यावेळी जरांगे यांनी एक बैठक घेतली. आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं. पीडित मुलीला न्याय द्यायचा असं म्हणाले. त्या बैठकीला आम्ही १० ते १२ जण होतो. आरोपीवर हल्ला करायचा असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार आम्ही चौघांनी आरोपीवर हल्ला केला त्यावेळी जरांगेंनी तिथून पळ काढला. ” असा आरोप बाबूराव वाळेकर यांनी केला.
“मनोज जरांगेंनी आत्तापर्यंत १० ते १२ लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. आम्ही तुरुंगात गेलो आणि प्रसिद्धी यांनी मिळवली. आम्ही तुरुंगात होतो पण आम्हाला काहीही मिळालं नाही. माझ्याकडे भयानक पुरावे आहेत, वेळ आली तर मी तेदेखील उघड करेन.” असा इशाराही वाळेकर यांनी दिला.
मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस Baburao Walekar on Jarange।
मनोज जरांगेंच्या आमिषाला कुणीही बळी पडू नका. मनोज जरांगे २०१९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. हा माणूस हार-तुरे आणि सत्कार याच्यासाठी भुकेला आहे. आत्महत्या ज्या गावात झाली तिथे जायचं आणि लोकांकडून सत्कार घ्यायचे असे त्याचे उद्योग आहेत. मनोज जरांगेने राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावर आरोप केलेला नाही. मराठा समाजाला ढाल करतात आणि प्रसिद्धी मिळवतात. राजेश टोपे २०१९ ला यांना भेटले होते. आत्ताही आंदोलन सुरु असताना राजेश टोपे आणि त्यांची गुप्त भेट झाली होती असाही आरोप वाळेकर यांनी केला.