शिरूर : शिरूर तालुक्यातील गोलेगावच्या महाजनमळा परिसरात दरावस्ती येथे तब्बल ४० किलो वजनाचा आणि अंदाजे १५ ते २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सतिश वाखारे यांच्या शेजारील शेतात हा अजगर निवांत पडलेला दिसताच ग्रामस्थांची गर्दी झाली. यावेळी पाहणीदरम्यान समोर आले की अजगराने एक शेळी पूर्णपणे गिळल्याची घटना घडली असून त्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सर्पमित्रांनी अत्यंत दक्षता आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला पकडत त्याच्या पोटातील शेळीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अजगर आक्रमक झाला. बचाव मोहिमेदरम्यान शेळी गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रचंड आकाराच्या अजगरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांनी वनविभागाला तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितरीत्या पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गोलेगाव महाजनमळा परिसरात एवढ्या मोठ्या अजगराचे दर्शन पहिल्यांदाच झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. जंगलपट्ट्यापासून दूर असूनही एवढ्या आकाराचा अजगर कसा आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून शिरूर तालुक्यातील परिसरात वन्यजीवांची वाढती वर्दळ हा गंभीर विचाराचा विषय असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.