हरारे -पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आणखी एक विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 2 हजार धावा करण्याचा विक्रम बाबरने केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बाबरने या विश्वविक्रमाला गवसणी घातली. बाबरने 52व्या डावात 2 हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर विराटला हाच विक्रम करण्यासाठी 56 डाव खेळावे लागले होते. झिम्बाब्वेविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होण्याआधी बाबर आझमने 51 सामन्यांत 49 डावांमध्ये 49च्या सरासरीने 1,940 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला फक्त 2 धावा करता आल्या, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 41 धावांची खेळी केली. यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला विराटचा विक्रम मोडण्यासाठी 17 धावांची आवश्यकता होती. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 1 हजार धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या डेव्हिड मलानच्या नावावर आहे. मलानने 24 डावांत, तर बाबरने 26 आणि विराटने 27 डावांमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी बाबरने एकदिवसीय क्रमवारीतही विराटला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला होता.