मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांची काल रात्री काही मारेकऱ्यांकडून हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांच्यावर 3 राऊंड फायर केले. त्यांच्या छातीत एक गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. तर अन्य एकजण फरार झाला आहे. बाबा सिद्दीकींची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं लीलावती रूग्णालयात धाव घेतली. तसंच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. तेव्हा बाबा सिद्दीकींनी सलमानच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली होती. यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. काय घेतला निर्णय? बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. या हत्येनंतर No visitors please म्हणजे कुणीही भेटायला येवू नये अशा सूचना सलमान खानच्या कुटुंबियांकडून करण्यात आल्या आहेत.