Baba Siddiqui case: मुख्य आरोपी झीशान अख्तर कॅनडात ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल याला कॅनडातील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडात पळून गेलेल्या झीशानला भारतीय एजन्सींच्या माहितीवरून पकडण्यात आले असावे, अशी शक्यता आहे. मुंबई पोलीस आता त्याला भारतात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत आहेत.
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बाबा सिद्दीकी यांची त्यांचे पुत्र आणि आमदार झीशान सिद्दीकी यांच्या बांद्रा येथील कार्यालयाबाहेर रात्री गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्दीकी यांचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्याशी जवळचे संबंध असल्याने ही हत्या झाल्याचा दावा टोळीने केला होता.
झीशान अख्तर हा पंजाबमधील जालंधर येथील नकोदरचा रहिवासी आहे. हत्येनंतर तो पाकिस्तानी अंडरवर्ल्डमधील शहझाद भट्टीच्या मदतीने देश सोडून पळाला होता. २०२५ च्या सुरुवातीला झीशानने एक व्हिडिओ जारी करून सिद्दीकी हत्या प्रकरणासह इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे कबूल केले होते.
झीशानवर खून, टार्गेट किलिंग आणि दरोड्यासह नऊ गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये अटक झालेला झीशान ७ जून २०२४ रोजी तुरुंगातून सुटला होता. तुरुंगातच त्याची लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या विक्रम ब्रारशी भेट झाली, ज्यामुळे तो टोळीशी जोडला गेला.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणी गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना अटक केली होती, तर मुख्य शूटर शिवकुमार गौतम अद्याप फरार आहे. आता झीशान अख्तरला मुंबईत आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





