Baba Siddique : बाबा सिद्दिकींवर झालेल्या गोळीबार प्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. बाबा सिद्दिकी हे आपला मुलगा झिशान सिद्दिकी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते.त्याचवेळी आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टींचा उलघडा होताना दिसत आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात तीन आरोपींचा समावेश होता. त्यातील दोघांना पोलिसांनी तात्काळ पकडलं मात्र एक जण गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. आतापर्यंत या गोळीबार प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
बाबा सिद्दिकी यांच्यावर फायरिंग करण्यापूर्वी आरोपींनी झाडांवर गोळीबार करून प्रॅक्टिस केली होती.आरोपींनी कर्जत-खोपोली रोडवर असलेल्या धबधब्याजवळील पलसदरी गावातील जंगलात प्रॅक्टिस केली होती, आणि त्यानंतर त्यांनी गोळीबार केला. आरोपींची सध्या चौकशी सुरु असून या प्रकरणात अजून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हत्येच्या दिवशी काय घडले?
बाबा सिद्दिकी चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकींवर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या.
त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागली होती. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे बाबा सिद्दिकी यांना 10-15 दिवसांपूर्वी धमकी देखील देण्यात आली होती.





