‘सरबत जिहाद’ म्हणजे काय? बाबा रामदेव यांचे ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य चर्चेत, नेटकऱ्यांनी केली टीका
Baba Ramdev Sharbat Jihad Remark | बाबा रामदेव हे त्यांच्या वक्तव्य आणि ‘पतंजली’ या कंपनीमुळे सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. आता नवीन वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘सरबत जिहाद’ असा उल्लेख केल्याने बाबा रामदेव वादात अडकले आहेत.
पतंजलीच्या गुलाब सरबतची जाहिरात करताना त्यांनी एका व्हिडिओमध्ये दावा केला की, काही कंपन्या सरबत विकून मिळालेल्या कमाईचा वापर मशिदी आणि मदरसे उभारण्यासाठी करत आहेत.
या व्हिडिओला ‘पतंजली प्रॉडक्ट्स’च्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे. आपल्या कुटुंबाला आणि निष्पाप मुलांना सॉफ्ट ड्रिंक्स आणि ‘सरबत जिहाद’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या टॉयलेट क्लीनरच्या विषापासून वाचवा. घरात फक्त पतंजली सरबत आणि ज्यूस आणा, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये रामदेव यांनी सॉफ्ट ड्रिंक्सवर कठोर टीका करत ते टॉयलेट क्लीनरसारखी असल्याचा आरोप केला. व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, एका बाजूला विषासारखी पेये आहेत, तर दुसरीकडे एक अशी कंपनी आहे जी शरबत विकून त्यातून मशिदी व मदरसे उभारते. त्यानुसार, हे त्यांच्या धर्माशी संबंधित असेल.
पतंजलीचा सरबत प्यायल्यास गुरुकुल, आचार्यकुलम, पतंजली विद्यापीठ आणि भारतीय शिक्षण बोर्डाला बळ मिळेल. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘वोट जिहाद’ प्रमाणेच आता ‘शरबत जिहाद’ही असल्याचा उल्लेख केला आणि नागरिकांना त्यापासून सावध राहण्याचं आवाहन केले.
दरम्यान, या वक्तव्यामुळे बाबा रामदेव अडचणीत येण्याच्या शक्यता आहे. या वक्तव्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याला धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न ठरवत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.





