रामपूर : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान पुन्हा एकदा चर्चेत आले असून सोमवारी रामपूर न्यायालयाने माजी आमदार अब्दुल्ला आझम यांच्याशी संबंधित असलेल्या दोन पॅनकार्ड प्रकरणामध्ये अब्दुला व आझम खान यांना दोषी ठरवताना, प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयातील कामकाजानंतर दोघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हा निकाल आझम खान यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या 104 खटल्यांपैकी असून न्यायालयाने 11 प्रकरणांमध्ये निकाल दिला. या ११ पैकी सहा प्रकरणांमध्ये आझम खान यांना दोषी ठरवण्यात आले असून पाच गुन्ह्यांमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सोमवारी निकाल दिलेले प्रकरण याच मालिकेचा भाग आहे. भाजपचे आमदार आकाश सक्सेना यांनी पॅनकार्ड संदर्भात खटला दाखल केला होता. या सुनावणीच्या वेळी आमदार सक्सेना देखील न्यायालयात हजर असल्याने, कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली होती. आझम खान व आकाश सक्सेना यांचे समर्थक न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आझम खान यांचा मुलगा असलेला अब्दुल्ला आझम यांनी निवडणूक लढविण्यासाठी किमान वयोमर्यादा पूर्ण न करताना, पॅनकार्ड मिळवले होते. वयोमर्यादा पूर्ण केल्यानंतर अब्दुल्ला आझम यांनी दुसरे पॅनकार्ड मिळवले. या प्रकरणामध्ये माजी आमदार अब्दुल्ला आझम यांचे वडील असणारे आझम खान यांच्यावर कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याबद्दल व दोन पॅनकार्ड बाळगल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी दोन्ही पिता पुत्रांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र या प्रकरणातील त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयाच्या खंडपीठाने या याचिकेमध्ये एफआयआर रद्द करण्याचे कोणतेही कारण सापडले नसल्याचे स्पष्ट केले होते.