Dahi ki Sabzi: आयुष्मान खुरानालाही आवडते ही खास दह्याची भाजी; रेसिपी झाली व्हायरल
Dahi ki Sabzi ही गरमागरम दह्याची भाजी पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करता येते. काही ठिकाणी ही भाजी पुलावासोबतही खाल्ली जाते. कमी वेळात तयार होणारी आणि चवीला भन्नाट असलेली ही रेसिपी उन्हाळ्यात नक्की ट्राय करून पाहण्यासारखी आहे.

Dahi Ki Sabzi: उन्हाळ्यात हलकं, थंड आणि चविष्ट काहीतरी खावंसं वाटतं. अशावेळी दह्याची भाजी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अभिनेता आयुष्मान खुरानाने एका मुलाखतीत दह्याची भाजी ही त्याची आवडती डिश असल्याचं सांगितलं होतं. ही भाजी चवदार तर असतेच, पण अगदी कमी वेळात तयारही होते.
दह्याची थंडगार चव, मसाल्यांचा तडका आणि सुगंधी फोडणी यामुळे ही भाजी उन्हाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाते. ही भाजी पोळी, पराठा किंवा भातासोबत खूप छान लागते.
दह्याची भाजी बनवण्यासाठी एक कप घट्ट आणि ताजं दही, दोन बारीक चिरलेले कांदे, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, कसुरी मेथी, मीठ आणि तेल किंवा तूप लागते. सजावटीसाठी कोथिंबीरही वापरता येते.

Dahi Ki Sabzi
भाजी तयार करण्यासाठी सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरीची फोडणी द्यावी. त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा घालून कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतावा. मग त्यात आलं-लसूण पेस्ट आणि इतर मसाले घालून चांगले मिसळावे.
यानंतर गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्यावं. कारण गरम मसाल्यात लगेच दही घातल्यास दही फाटण्याची शक्यता असते. मिश्रण थोडं थंड झाल्यावर त्यात हळूहळू दही घालून सतत हलवत राहावं.
नंतर पुन्हा मंद आचेवर ही भाजी शिजवावी. काही मिनिटांनी तेल वर येऊ लागलं की त्यात गरम मसाला आणि कसुरी मेथी घालावी. शेवटी कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा.
ही गरमागरम दह्याची भाजी पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करता येते. काही ठिकाणी ही भाजी पुलावासोबतही खाल्ली जाते. कमी वेळात तयार होणारी आणि चवीला भन्नाट असलेली ही रेसिपी उन्हाळ्यात नक्की ट्राय करून पाहण्यासारखी आहे.





