Ayush Shetty : थरारक लढतीत महाउलटफेर! भारताचा युवा शटलर आयुष शेट्टी ठरला ‘जायंट किलर’
भारताचा युवा शटलर आयुष शेट्टी (Ayush Shetty) याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या आणि स्पर्धेतील गतविजेत्या चीनच्या शी यु की याचा पहिल्याच फेरीत पाडाव करत स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला.

Ayush Shetty : जागतिक बॅडमिंटनच्या पटलावर भारताच्या तरुण खेळाडूंनी नवा इतिहास (Ayush Shetty) रचला आहे. एका बाजूला अनुभवी पीव्ही सिंधू आणि महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने सहज विजय मिळवून आगेकूच केली असताना, पुरुष एकेरीत मात्र एका अभूतपूर्व थराराची नोंद झाली.
भारताचा युवा शटलर आयुष शेट्टी (Ayush Shetty) याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या आणि स्पर्धेतील गतविजेत्या चीनच्या शी यु की याचा पहिल्याच फेरीत पाडाव करत स्पर्धेत मोठा भूकंप घडवून आणला. तीन गेमपर्यंत चाललेल्या या अत्यंत अटीतटीच्या संघर्षात आयुषने २१-१४, १३-२१, २१-१९ अशा फरकाने विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच आयुषने कमालीचा आत्मविश्वास दाखवला. कोर्टच्या जवळच्या बाजूने खेळत त्याने पहिल्या गेमवर पूर्ण नियंत्रण मिळवले. वेगवान रॅलीज आणि अचूक फटक्यांचा भडिमार करत त्याने जागतिक अव्वल खेळाडूला लय पकडण्याची संधीच दिली नाही आणि पहिला गेम २१-१४ असा सहज खिशात घातला.
मात्र, दुसऱ्या गेममध्ये अनुभवी शी यु कीने जोरदार पुनरागमन केले. कोर्टची बाजू बदलल्याचा फायदा घेत त्याने नेटवरील सुरेख खेळ आणि ताकदवान स्मॅशच्या जोरावर आयुषची लय बिघडवली आणि १३-२१ असा दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली.
निर्णायक तिसरा गेम म्हणजे संयम आणि तंत्राची खरी परीक्षा ठरली. गतविजेत्याविरुद्ध खेळताना आयुषवर मानसिक दडपण होते, शिवाय भूतकाळातील तीन पराभवांचा इतिहासही समोर होता. पण त्या सर्व गोष्टी मागे टाकत, प्रेक्षकांच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर आयुषने सुरुवातीलाच १७-७ अशी भक्कम आघाडी घेतली.
पराभवाच्या छायेत असताना यु कीने सर्व ताकद पणाला लावून गुणसंख्या १८-१५ वर आणली. आयुषने पुन्हा मुसंडी मारत २०-१६ अशी आघाडी घेत चार मॅच पॉईंट मिळवले. यु कीने कडवी झुंज देत सलग तीन गुण मिळवून स्कोअर २०-१९ असा आणून सामन्यात प्रचंड रोमांच निर्माण केला. अखेरच्या क्षणी आयुषने (Ayush Shetty) कमालीचा संयम दाखवत अप्रतिम बॅकहँड व्हॉलीवर विजयी गुण टिपला आणि क्रीडाविश्वाला थक्क करणारा विजय साकारला.
शी यु कीच्या वेगवान स्मॅशेसचा अचूक बचाव, नेटवरील हुशार ड्रॉप शॉट्स आणि कणखर मानसिकता या बळावर आयुषने हा ऐतिहासिक विजय नोंदवला. याआधी भारताच्या पीव्ही सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबलला २१-७, २१-११ असे तर ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने स्पेनच्या पॉला लोपेझ-लुसिया रॉड्रिग्ज जोडीला २१-९, २१-१३ असे सहज नमवून भारताची विजयी मोहीम सुरू ठेवली.






