पुणे पालिकेच्या शाळेत फुलली ‘आयुर्वेद बाग’

डॉ. वसंतदादा पाटील शाळेत मुख्याध्यापीकेच्या दूरदृष्टीतून उपक्रम

बिबवेवाडी – करोना आजाराच्या संसर्ग काळात पूर्ण जगाला नैसर्गिक फळभाज्या आणि वनस्पतींचे महत्त्व समजले आहे. करोना आजारावर मात करण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे आवळा, तुळस अशा स्वदेशी आयुर्वेदीक वनस्पतींचे महत्त्वही लक्षात आले आहे. याच दूरदृष्टीतून चारवर्षांपूर्वी शुक्रवार पेठेतील महानगरपालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील शाळेत माजी मुख्याध्यापिका सिमा चव्हाण यांनी लावलेल्या फळांची व आयुर्वेदीक औषधी वनस्पतींची बाग आता चांगली फुलली आहे.

विद्यार्थ्यांना झाडे लावणे व जगविणे यांचे महत्व समजावे यासाठी अशा वनस्पतींची लागवड करण्यास चार वर्षांपूर्वीच मुख्याध्यापिका सिमा चव्हाण यांनी शाळेत सुरूवात केली होती. कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजिराव मुळीक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. शाळेत शतावरी, आवळा, वाळा, अडुळसा,कढीपत्ता, दगडी पाला, ओवा, ब्राम्ही, तुळस, गवती चहा, आले तसेच केळीची लागवड करण्यात आली आहे. आज, या सर्व वनस्पती जोमाने वाढल्या आहेत. या झाडांना येणाऱ्या फळांचा आस्वाद शाळेतील विद्यार्थी घेतात.

याबाबत सिमा चव्हाण म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व अनेक संकटांवर मात करून शिकत असतात. विद्यार्थी अर्धपोटी शाळेत येत असल्याने ते भोवळ येऊन पडल्याने अनेकदा पाहिले आहे.

तेव्हा पासून माझे एक स्वप्न होते की, शाळेतच औषधी वनस्पतींची बाग असावी.त्यापासून मिळणारी फळेही अशा विद्यार्थ्यांना देता येतील. या हेतूने हा उपक्रम सुरू केला व त्याला यश मिळाले आहे. करोनाच्या काळातही सुरक्षारक्षक सतिष थोरात यांनी शाळेतील बागेची काळजी घेतल्याने सर्व वनस्पती जोमाने वाढत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.