satara | आवारवाडी ग्रामस्थांना महिन्यापासून टँकरची प्रतीक्षा

पुसेगाव, (प्रतिनिधी)- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील अनेक गावांसह वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना नागरिकांच्या मागणीनुसार शासनाकडून काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
मात्र, रेवलकरवाडी ग्रामपंचायतीने आवारवाडीच्या पिण्याच्या पाण्यासाठी एक महिन्यापूर्वी खटाव पंचायत समितीकडे टँकर सुरु करण्याची मागणी करून देखील येथील ग्रामस्थ शासकीय टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
आवारवाडी ग्रामस्थ मागील काही महिन्यांपासून दुष्काळाशी दोन हात करत आहेत. अशातच उन्हाळ्याची भीषणता आणखी वाढल्याने पाण्याचे सर्व स्त्रोत आटले आहेत. परिणामी ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करणे अशक्य झाले आहे. गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती झाली आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे.
रेवलकरवाडी ग्रामपंचायतीने पाण्याची गरज लक्षात घेऊन आवारवाडी गावामध्ये पाण्याचे टँकर सुरु करण्याची मागणी खटाव पंचायत समितीकडे एक महिन्यापूर्वी करून देखील संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांकडून पंचायत समिती, खटाव तहसील कार्यालयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
संबंधित विभागाने रेवलकरवाडी ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी तत्काळ शासकीय टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर करण्याची गरज आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आवारवाडी येथील पाण्याचे सर्व स्त्रोत आटले आहेत. साधारण एक महिन्यापूर्वी टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव देऊन देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी. – सुवर्णा मदने (सरपंच रेवलकरवाडी)





