कात्रज/धनकवडी : आगामी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, ‘एक प्रयत्न समावेशक मतदानासाठी’ हे ब्रीद समोर ठेवून धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामार्फत अनोखा उपक्रम राबवण्यात आला. ८ जानेवारी २०२६ रोजी आबा बागुल उद्यान येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेखा भणगे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेंद्र भवाळकर आणि तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधी कादंबरी शेख उपस्थित होत्या. यावेळी बोलताना कादंबरी शेख म्हणाल्या की, “महानगरपालिकेतील सर्व तृतीयपंथी बांधव या निवडणुकीत केवळ मतदानच करणार नाहीत, तर संपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवतील.” तृतीयपंथी समाज हा आपल्याच समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देणे आणि निवडणूक प्रक्रियेत त्यांचा १०० टक्के सहभाग सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. तृतीयपंथीयांनी कोणत्याही संकोचाशिवाय मुख्य प्रवाहात येऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. हा कार्यक्रम धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल ऑफिसर राम मोहिते, अमृत बबलादी आणि सुवर्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी खालील पथकांनी मोलाचे योगदान दिले. धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयातील संपूर्ण स्वीप (SVEEP) टीम, बालाजी नगर येथील संपूर्ण सफाई सेवक आणि सहाय्यक कर्मचारी. “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. तृतीयपंथी बांधवांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना सन्मानाने या प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे.” -निवडणूक प्रशासन, धनकवडी क्षेत्र