राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सन 2026 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मंगळवारी (दि. 16) करण्यात आले. बँकेच्या या दिनदर्शिकेला ग्राहक व नागरिकांकडून दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी नवीन व समाजोपयोगी संकल्पना दिनदर्शिकेतून मांडल्या जातात. आतापर्यंत बँकेचे संचालक राजेंद्र सांडभोर यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक बँकिंग सुविधा, महाराष्ट्रातील उत्सव व परंपरा, शिवरायांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, विविध आजारांविषयी जनजागृती, देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची माहिती, ग्राहक जागरूकता, क्रांतिकारी परिवर्तन तसेच दळणवळणाच्या इतिहासातून संस्कृतीचा विकास आदी विषयांवर माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यावर्षीच्या 2026 च्या दिनदर्शिकेमध्ये पारंपरिक व सौर ऊर्जा स्रोत या विषयावर विशेष भर देण्यात आला आहे. जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या पानांवर सौर पाणी गरम करणारी यंत्रणा, सौर चूल, सौर पॅनेल, सौर पंप, सौर स्ट्रीट लाईट, सौर होम सिस्टीम, सौर इन्व्हर्टर, सौर बॅटरी स्टोरेज, सौर पंखा व सौर एसी, सौर कारपोर्ट व ई-चार्जिंग स्टेशन, सौर वाहने तसेच सौर ट्रॅकिंग सिस्टीम यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या प्रकाशनप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे, ज्येष्ठ संचालक किरण आहेर, विजयाताई शिंदे, राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, राहुल तांबे, रामदास धनवटे, समीर आहेर, सचिन मांजरे, धर्मेंद्र खांडरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, सरव्यवस्थापक संजय ससाणे, अमृत टाकळकर, दिलीप मलघे, मंजीद महिंदर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक जिरण शिंदे, शिवाजीराव गव्हाणे, बँकेचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक राजेंद्र सांडभोर यांनी केले, तर उपाध्यक्षा अश्विनी पाचारणे यांनी आभार मानले. दरवर्षी बँकेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी संकल्पना दिनदर्शिकेतून मांडल्या जात आहेत. बँकेचे सभासद व ग्राहकांकडून या दिनदर्शिकेला मोठा प्रतिसाद मिळतो. यावर्षी पारंपरिक व सौर ऊर्जा स्रोत, त्यांची उपकरणे आणि उपयोग याबाबत माहिती देण्यात आली असून, सौर ऊर्जेच्या माध्यमातून समाजात पर्यावरणपूरक ऊर्जा वापर वाढावा, हा संदेश देण्यात आला आहे. -सागर पाटोळे, अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक लि.