Pimpri : जगद्गुरु इंग्लिश स्कूलमध्ये लोकशाहीचा जागर

देहूगाव : देहूगाव येथील साकोरे शिक्षण संस्थेच्या जगद्गुरु इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी लोकशाही व निवडणूक प्रक्रियेचे प्रभावी प्रात्यक्षिक म्हणून खास उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी ईव्हीएमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवडणूक घेण्यात आली.
या उपक्रमांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी सुहास धाईजे यांच्या देखरेखीखाली हेडबॉय, हेडगर्ल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा एकूण २२ पदांसाठी निवडणूक पार पडली. सहा वेगवेगळ्या वार्डांतून उमेदवार उभे राहिले होते. मतदार विद्यार्थ्यांनी ईव्हीएम यंत्राद्वारे मतदान करून आपले प्रतिनिधी निवडले.
यामध्ये सौजन्य खांडेकर (हेडबॉय), अक्षता गायकवाड (हेडगर्ल), यश पवार (मुख्यमंत्री) आणि विनायक बोडखे (उपमुख्यमंत्री) यांची निवड जाहीर झाली. विजयी उमेदवारांच्या हस्ते आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष साकोरे, सचिव दीपाली साकोरे, मुख्याध्यापिका मीनाक्षी गाडेकर, पर्यवेक्षक हिना मुजावर, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि नव्याने नियुक्त मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले.





