केसवानी यांचा आरोप : स्वस्तात जमीन विक्री प्रकरण
पिंपरी – स्वस्तात जमीन विक्री करावी यासाठी दबाव आणून धमकी दिल्याप्रकरणी रमेश ओसवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आठ वर्षापासून पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही, असा आरोप केसवानी यांनी केला आहे.
मुकेश केसवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांनी 1992 मध्ये वाकड येथे कलाटे यांच्याकडून जमीन खरेदी केली होती. याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र 1996 मध्ये रमेश कुंदनमल ओसवाल (रा. जैन मंदिराजवळ, ढोरे नगर, जुनी सांगवी) यांनी जागेचे बनावट साठेखत तयार केले. तसेच 2011 मध्ये ही जागा अल्पदरात विकावी, यासाठी केसवानी यांच्यावर काही जणांनी दबाव आणला होता.
याप्रकरणी केसवानी यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली. मात्र ओसवाल याला अटक झालेली नव्हती. सन 2018 केसवांनी यांनी बनावट कागदपत्रांबाबत न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी देखील न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयास दिला. मात्र 2011च्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी रमेश ओसवाल याला अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. त्याला अटक करावी, अशी मागणी केसवानी यांनी पोलीस आयुक्त आणि पिंपरी पोलिसांकडे केली आहे.
रमेश ओसवाल याच्या विरोधात 2011 मध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र अद्यापपर्यंत अटक झालेली नसल्याने केसवानी यांनी न्यायालयात अपील केले. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही ओसवाल याला अटक करावी, अशी मागणी केली. त्यानुसार पोलीस मागावर आहेत, लवकरच अटक करण्यात येईल.
– ज्ञानोबा निकम, उपनिरीक्षक-पिंपरी पोलीस ठाणे