#AUSvIND : रोहितचा लवकरच सरावाला प्रारंभ

मेलबर्न – हिटमॅऩ रोहित शर्मा येत्या 30 डिसेंबरपासून भारतीय संघातील खेळाडूंसह सरावाला सुरुवात करणार आहे. रोहितचा ऑस्ट्रेलियातील विलगीकरणाचा कालावधी लवकरच पूर्ण होत आहे. त्यामुळे रोहित लवकरच संघासोबत सराव करताना दिसणार आहे.
अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत दुखापत झाल्यानंतर रोहित तंदुरुस्तीसाठी मेहनत घेण्याकरता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला होता. त्यानंतर तो जेव्हा पूर्ण तंदुरुस्त ठरला तेव्हा त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले होते.
रोहितच्या पुनरागमनाच्या बातमीमुळे टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे. मात्र, रोहितला केवळ आपल्या सहकाऱ्यांसोबत राहता येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी खेळता येणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. रोहितला या सामन्यात खेळण्यासाठी आणखी एक फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच ऑस्ट्रेलियाविरोधात खेळता येईल.





