मेलबर्न – भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा स्नायूंना झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त ठरला असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जडेजाचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे.
डावखुरा अष्टपैलू खेळाडू जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात स्नायूंची दुखापत झाली. त्याच लढतीत मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू हेल्मेटला लागला असला तरीही त्याला चक्कर येऊ लागली होती. त्यामुळे त्याला उर्वरित दोन सामन्यांसह पहिल्या कसोटीलाही मुकावे लागले. परंतु या दोन्ही दुखापतींतून जडेजा पूर्णपणे सावरला असून त्याने सरावालाही प्रारंभ केला आहे.
मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीला प्रारंभ होणार असून या लढतीसाठी भारतीय संघात अनेक बदल अपेक्षित आहेत. अॅडलेड येथील प्रकाशझोतातील पहिल्या कसोटीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने कसोटी क्रिकेटमधील भारताची नीचांकी धावसंख्या नोंदवली. त्यातच कोहली आता पॅटर्निटी रजेमुळे मायदेशी परतणार असल्याने जडेजाच्या उपलब्धतेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता काहीशी कमी झाली आहे. 32 वर्षीय जडेजाला दुसऱ्या लढतीत सहाव्या क्रमांकावरील फलंदाज हनुमा विहारीच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे.
प्रकाशझोतातील कसोटीत विहारीने दोन्ही डावांत अनुक्रमे 16 आणि 8 धावा केल्या. आतापर्यंतच्या 10 कसोटींमध्ये त्याला एकच शतक झळकावता आले आहे. दुसरीकडे 49 कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये भारतासाठी दुहेरी योगदान दिले. त्यातच आता वेगवान गोलंदाज महंमद शमीही जायबंदी झाल्याने भारत चारऐवजी पाच परिपूर्ण गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता जास्त आहे.