#AUSvIND : वृद्धिमान साहा तंदुरुस्त ठरल्याने कोहलीला दिलासा

सिडनी – ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाला सुरूवातीला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले होते. मात्र, आता यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा तंदुरुस्त झाल्याने संघाला दिलासा मिळाला आहे.
त्याच्या जोडीला वेगवान गोलंदाज इशांत शर्माने देखील नेटमध्ये सराव सुरु केल्याने कर्णधार विराट कोहलीची चिंता काही प्रमाणात का होईना मिटली आहे.
पुढील शुक्रवारपासून या दोन संघांदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत असून भारताचे दुखापतग्रस्त खेळाडू तंदुरुस्त ठरत असल्याने संघाची चिंता दूर होत आहे. भारतीय संघातील खेळाडू करोनाच्या नियमांनूसार सध्या विलगीकरणात असले तरीही त्यांना मर्यादीत वेळेत सराव करण्याची परवानगी दिली गेली असल्याने लॉकडाऊनच्या काळाप्रमाणे त्यांना अडकून राहावे लागतद नसल्याने या मालिकेत भारतीय संघ संपूर्ण ताकदीने सहभागी होण्यासाठी सज्ज बनला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला पर्यायी यष्टीरक्षकाचा विचार करावा लागणार होता. मात्र, तो तंदुरुस्त ठरल्याने संघाची चिंता मिटली आहे. इतकेच नव्हे तर 27 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी देखील लोकेश राहुलचा पर्याय म्हणून साहाकडे पाहिले जात आहे.
ऑसी खेळाडू अनवाणी खेळणार
जगभरात वाढत चाललेल्या वर्णद्वेषाचा निषेध करण्यासाठी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर उतरताना ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू चक्क अनवाणी खेळणार आहेत. जगभरात वर्णद्वेषाची कीड वाढत चालली आहे. हे सर्व थांबलेच पाहिजे व सर्वांनीच त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबतच लोकांना अवगत करण्यासाठी आम्ही अनवाणी खेळण्याचा निर्णय घेतल्याचे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनी याने सांगितले.





