ऑस्ट्रेलियन महिलेला दिलासा 

पतीच्या पहिल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दाखल केलेल्या दाव्यातून वगळले 

पुणे- पतीच्या पहिल्या घटस्फोटीत पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दाखल केलेल्या दाव्यात ऑस्ट्रेलियन महिलेला दिलासा मिळाला आहे. दाखल केल्यानंतर दाव्यातून त्यांना चार वर्षांनी वगळण्याचा आदेश पिंपरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विनया देसाई यांनी दिला आहे.

माधव आणि माधवीचे (नावे बदलली आहे) दोघांचे लग्न झाले. दोघेही उच्चशिक्षित आहेत. माधव ऑस्ट्रेलियात नोकरी करतो. लग्नानंतर काही काळ ते दोघे ऑस्ट्रेलियात राहिले. त्यानंतर ती जून 2011 मध्ये भारतात परत आली. ती पुन्हा गेलीच नाही. माधवने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व स्विकारले आहे. त्यामुळे तेथील न्यायालयातून त्याने घटस्फोट मिळविला.

त्यानंतर मारीया (नाव बदलले आहे) या ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या महिलेशी 2013 मध्ये लग्न केले. तेव्हापासून दोघांचा संसासर सुरू आहे. दरम्यान 2015 मध्ये माधवीने पिंपरी येथील न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. त्यामध्ये माधव, दुसरी पत्नी मारीया आणि माधवच्या घरच्यांना प्रतिवादी केले आहे. या प्रकरणात मारीया ऍड. सुनीता बन्सल आणि ऍड. नितीश चोरबेले यांच्यामार्फत न्यायालयात हजर राहिल्या. त्यांनी दाव्यातून वगळण्यासाठी अर्ज केला.

ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने घटस्फोट दिल्यानंतर मारीया आणि माधव यांचे लग्न झालेले आहे. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल होण्यासाठी त्या एका छताखाली राहिल्या पाहिजेत. मात्र, माधवी आणि मारीया कधीही एकत्र राहिल्या नाहीत. त्यामुळे मारीया यांना दाव्यातून वगळण्याची मागणी ऍड. बन्सल आणि ऍड. चोरबेले यांनी केली. ती मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने वरील आदेश दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.