मोठा निर्णय: ‘या’ देशात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापराला बंदी

कॅनबेरा, (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात पंतप्रधान अँथनी अल्बाजीनज यांच्या सरकारने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वय १६ वर्षे असावे, असा ऐतिहासिक कायदा ऑस्ट्रेलियाच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये मंजूर करण्यात आला आहे.
सोशल मीडियाच्या वापरासाठी १६ वर्षाची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी युवक, पालक, मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ उद्योग आणि नागरी संघटनांशी व्यापक चर्चा करण्यात आली होती. विकासाच्या महत्वाच्या काळात झालेल्या नुकसानीला कमीत कमी करण्याच्या हेतूने समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान अल्बानीज आणि प्रसारण मंत्री मिशेल रोवलॅन्ड यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियाच्या वापरासाठी १६ वर्षांखालील व्यक्तीला सोशल मीडियाचा वापर करण्यास यामुळे प्रतिबंध केला जाईल. जर अल्पवयीन व्यक्तीचे सोशल मीडियावर खाते असल्यास संबंधित कॉर्पोरेशनला ३२ दशलक्ष डॉलरचा दंड केला जाईल, असे पंतप्रधान अल्बानीज यांनी म्हटले आहे.
या कायद्यानुसार वापरकर्त्यांना वयाचा पुरावा म्हणून सरकारी कागदपत्रे सादर करण्याचे बंधन असणार नाही. मात्र हे बंधन घातले जाणार आहे. या कायद्याच्या कक्षेमध्ये सोशल मीडियावरील कोणते प्लॅटफॉर्म येणार आहेत, हे निश्चित समजू शकलेले नाही. स्नॅपचॅट, टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि एक्स हे प्लॅटफॉर्म या कायद्याच्या कक्षेत असतील, असे अल्बानीज यांनी म्हटले आहे. मात्र यूट्युब आणि व्हॉटस ऍपला यातून वगळण्यात येणार आहे.





