Champions Trophy : ऑस्ट्रेलिया -दक्षिण अफ्रिका सामना रद्द ! दोन्ही संघांसाठी पुढील सामना करो या मरो

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे, ब गटातून अजून कोणताच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नाही. या गटातून कोण उपांत्य फेरी गाठणार हे सांगणं कठीण आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना रद्द झाल्याने उपांत्य फेरीचं गणित पुन्हा एकदा किचकट बनले आहे. त्यामुळे या गटातील प्रत्येक सामना आता करो या मरोची लढाई असणार आहे.
कसे असणार उपांत्य फेरीचे समीकरण?
चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांनी पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरी गाठण्याचं दोन्ही संघांचं स्वप्न होतं. पण पावसामुळे या स्वप्नावर पाणी पडलं आहे. कारण हा सामना नाणेफेक होण्याआधीच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. साखळी फेरीतील सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने त्याचा फटका या दोन्ही संघांना बसला आहे. आता दोन्ही संघांना उपांत्य फेरीसाठी पुढचा सामना जिंकणं भाग आहे.
साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला, तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले होते. तर इंग्लंड आणि अफगाणिस्तानला अद्याप खाते खोलता आले नाही. आजचा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील सामना रद्द झाल्याने दोन्ही प्रत्येकी 3 गुण झाले आहेत. त्यामुळे इंग्लंड आणि अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.
पण या दोन्ही संघातील सामना हा करो या मरो असणार आहे. कारण या सामन्यात जो संघ हरणार तो संघ थेट स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. अफगाणिस्तानचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी, तर दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. त्यामुळे आता कोणता संघ उपांत्य फेरी गाठतो हे पाहणे आता चुरशीचे झाले आहे.





