सिडनी कसोटीवरही ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

सिडनी – ऍशेस मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजने सलग दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावले. यामुळे या सामन्यावर यजमान ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे.
चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात 11 षटकात बिनबाद 30 धावा केल्या असून अद्याप अखेरच्या दिवशी त्यांना 358 धावांची गरज आहे.ऑस्ट्रेलियाने त्यांचा दुसरा डाव 68.5 षटाकात 6 बाद 265 धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावातील 122 धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर 388 धावांचे आव्हान ठेवले.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. त्याने 138 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार खेचले. त्याचे या सामन्यातील हे दुसरे शतक ठरले. त्याने पहिल्या डावात 137 धावांची खेळी केली होती.
ख्वाजाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमेरॉन ग्रीनने देखील अर्धशतकी खेळी केली.
त्याने 122 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 74 धावा केल्या. तसेच मार्कस हॅरिस (27), मार्नस लॅब्यूशेन (29) आणि स्टीव्ह स्मिथ (23) यांनी 20 धावांचा टप्पा ओलांडला.इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मार्क वूडने 2 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली. विशेष म्हणजे जॅक लीचला या डावात हॅट्रिक घेण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव त्याचे षटक सुरू असतानाच घोषित केल्याने त्याची ही संधी हुकली.
त्याने 69व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीन आणि पाचव्या चेंडूवर ऍलेक्स कॅरेला बाद केले होते. मात्र तो सहावा चेंडू टाकायच्या आधीच ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला.
तत्पूर्वी, इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिल्या डावातील 71व्या षटकापासून आणि 7 बाद 258 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली.
मात्र, दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडने उर्वरित तिन्ही विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 79.1 षटकात 294 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना 122 धावांची पिछाडी स्विकारावी लागली.संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 8 बाद 416 घोषित. इंग्लंड पहिला डाव – 79.1 षटकांत सर्वबाद 294 धावा.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 68.5 षटकांत 6 बाद 265 घोषित. इंग्लंड दुसरा डाव – 11 षटकांत बिनाबाद 30 (झॅक क्रॉली खेळत आहे 22, हसिब हमीद खेळत आहे 8).





