IND vs AUS ODI Series 2024 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वीस वर्षीय स्टार खेळाडूला संघातून डच्चू…

India Women vs Australia Women ODI : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वनडे मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी खराब फॉर्मशी झुंजत असलेली युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माला संघात स्थान मिळालेले नाही. श्रेयंका पाटीललाही या संघात स्थान देण्यात आलेले नाही. शेफाली आणि श्रेयंकाला वगळण्यात आले असले तरी संघाच्या नेतृत्वात कोणताही बदल झालेला नाही. हरमनप्रीत कौर संघाची कर्णधार तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल.
गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव करणाऱ्या संघातील उमा छेत्री, डी हेमलता, श्रेयंका पाटील आणि सायली सातघरे यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. हरलीन देओल, ऋचा घोष, मिन्नू मणी, तीतास साधू आणि प्रिया पुनिया यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ऋचा घोषने 12वीच्या परीक्षेसाठी न्यूझीलंड मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते.
शेफालीचा खराब फाॅर्म चिंतेचा विषय…
भारतीय महिला संघाने नुकतेच घरच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. या मालिकेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केलेल्या 5 खेळाडूंची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. या 5 खेळाडूंमध्ये शेफाली वर्मा आणि श्रेयंका पाटील यांचाही समावेश आहे. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये शफालीचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे कारण तिला या वर्षी 6 सामन्यांत 18 च्या सरासरीने केवळ 108 धावा करता आल्या आहेत.
तसेच शेफालीने न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यात 56 धावा केल्या होत्या. यापूर्वी टी-20 विश्वचषकातही तिची कामगिरी चांगली नव्हती. या स्पर्धेत तिने 4 सामन्यात 97 धावा केल्या होत्या. शेफाली वर्माला वगळण्यात आल्याने यास्तिका भाटियाला स्मृती मंधनासोबत सलामीची संधी मिळणार आहे.
A look at #TeamIndia‘s ODI squad for the upcoming tour of Australia 👌👌#AUSvIND pic.twitter.com/q0LRy53sSD
— BCCI Women (@BCCIWomen) November 19, 2024
असे असेल वेळापत्रक…
मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 5 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये आणि दुसरा सामना 8 डिसेंबरला, तर तिसरा सामना 11 डिसेंबरला पर्थमध्ये खेळवला जाईल. मालिकेतील पहिला व तिसरा सामना हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.50 वाजता तर दुसरा सामना पहाटे 5.15 वाजता सुरू होतील.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा , मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, राधा यादव, तीतास साधू, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, सायमा ठाकोर





