AUS vs ENG Ashes Series Updates : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘ॲशेस’ मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ४ जानेवारी २०२६ पासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेत अष्टपैलू ब्यु वेबस्टर आणि यष्टिरक्षक फलंदाज जॉश इंग्लिस या दोन खेळाडूंना संघातून मुक्त (रिलीज) केले आहे. बीबीएल (BBL) साठी दिली परवानगी – मेलबर्न येथे झालेली चौथी कसोटी अवघ्या दोन दिवसांत संपुष्टात आली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४ गड्यांनी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, मालिकेत त्यांनी ३-१ अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. पाचवी कसोटी सुरू होण्यास अद्याप एक आठवड्याचा अवधी असल्याने, या दोन्ही खेळाडूंना ‘बिग बॅश लीग’मध्ये खेळण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्यु वेबस्टर सोमवारी मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात होबार्ट हरिकेन्सचे प्रतिनिधित्व करेल. दुसरीकडे, जॉश इंग्लिस मंगळवारी पर्थ स्कॉर्चर्ससाठी सिडनी थंडरविरुद्ध मैदानात उतरेल. हे दोन्ही खेळाडू आपापले बीबीएल सामने खेळल्यानंतर पुन्हा सिडनी येथे ऑस्ट्रेलियन संघात सामील होतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. हेही वाचा – Navjot Singh Sidhu : ‘कसोटीमधून निवृत्ती मागे घे, तू २४ कॅरेट सोने आहेस!’, सिद्धूंची विराटसाठी भावुक पोस्ट वेबस्टरला संधी मिळण्याची शक्यता – यंदाच्या मोसमात सात कसोटी सामने खेळणाऱ्या वेबस्टरला पर्थमधील पहिल्या ॲशेस सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. मात्र, कॅमेरून ग्रीनची खराब फॉर्म आणि सततचे अपयश पाहता, सिडनी कसोटीत वेबस्टरला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जॉश इंग्लिसने ब्रिस्बेन आणि ॲडलेड कसोटीत तीन डावांत केवळ ३२ धावा केल्या आहेत, त्यामुळे त्याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण दिसत आहे. हेही वाचा – Ben Stokes : ‘जर हे इतरत्र घडले असते, तर खूप गदारोळ झाला असता’; स्कोक्सने मेलबर्न पिचवर सुनावलं ब्रेट लीचा होणार सन्मान – एकीकडे संघात फेरबदल होत असतानाच, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज ब्रेट ली याला निवृत्तीनंतर १३ वर्षांनी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट करून ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष ४ जानेवारीला होणाऱ्या सिडनी कसोटीकडे लागले आहे, जिथे ऑस्ट्रेलिया मालिका ४-१ ने जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड आपला सन्मान राखण्यासाठी मैदानात उतरेल.