मॅके – आजपासून (गुरुवार,31) भारत-अ व ऑस्ट्रेलिया-अ यांच्यातील लढतींना सुरुवात होत आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत अ संघात समावेश असलेल्या अभिमन्यू ईश्वरन, नितीशकुमार रेड्डी व प्रसिद्ध कृष्णा या तीनही खेळाडूंची निवड बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या खेळाडूंवर संघ व्यवस्थापन विशेष लक्ष ठेवणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वीच कर्णधार रोहित शर्मा पहिल्या एक किंवा दोन लढतीमध्ये वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नसल्याचे सांगितले होते. अशा वेळेस अभिमन्यू ईश्वरन या 26 वर्षीय फलंदाजाला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. ईश्वरन हा अनुभवी फलंदाज असून त्याने आतापर्यंत 99 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7638 धावा केल्या आहेत. यामध्ये 27 शतके व 29 अर्धशतकांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील असल्याने संधी मिळाल्यास त्याचा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. अभिमन्यूने भारतात धावांचा रतीब घातला असला तरी देखील ऑस्ट्रेलियामध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी असणार आहे. वेगवान गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी अशा दोन्ही गोष्टी करू शकणाऱ्या नितीशकुमार रेड्डीची निवड बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी करण्यात आली आहे. दुखापतीतून सावरलेल्या शार्दूल ठाकूर पेक्षा नितीशकुमार रेड्डीला निवडसमितीने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या मालिकेतून आपली क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी नितीशकुमारकडे असणार आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा नंतर भारत अ संघात समावेश करण्यात आला. दुखापतीतून सावरल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने दुलीप करंडक, इराणी चषक, रणजी करंडक या तीनही स्पर्धेत खेळताना 7 लढतीत केवळ 7 बळी टिपले आहेत. मात्र उंच असलेल्या वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला उंचीचा ऑस्ट्रेलियात फायदा होईल या उद्देश्याने निवड समितीने त्याला संधी दिली आहे. या तिघांच्या व्यतिरिक्त कर्णधार ऋतुराज गायकवाड, आघाडीच्या फळीतील फलंदाज बी. साईसुदर्शन, वेगवान गोलंदाज यश दयाल व नावादीप सैनी, मधल्या फळीतील फलंदाज देवदत्त पडिक्क्ल हे देखील सातत्याने चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघाचे दरवाजे ठोठावत आहेत. या लढतीमध्ये यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन देखील मिळालेल्या संधीचा फायदा करून घेण्यासाठी उत्सुक असणार आहेत. ICC Test Rankings : आफ्रिकेच्या रबाडाची क्रमवारीत मोठी झेप, बुमराहला बसला मोठा फटका… संघ खालीलप्रमाणे – भारत अ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, बी. इंद्रजीत, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), मुकेश कुमार, रिकी भुई, नितीशकुमार रेड्डी, मानव सुथर, नवदीप सैनी, खलील अहमद, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा. ऑस्ट्रेलिया अ : नॅथन मॅकस्विनी (कर्णधार), कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, स्कॉट बोलँड, जॉर्डन बकिंगहॅम, कूपर कॉनोली, ऑली डेव्हिस, ब्रेंडन डॉगेट, मार्कस हॅरिस, सॅम कोन्स्टास, नॅथन मॅकअँड्र्यू, मायकेल नेसर, टॉड मर्फी, फर्गस ओ’नील, जिमी पिअर्सन, जोश फिलिप, कोरी रोचिओली, ब्यू वेबस्टर.