“औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याने अनेक मंदिरे बांधली”; वादग्रस्त वक्तव्यानंतर अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल

Abu Azmi controversial statement | समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका केली गेली.
औरंगजेबाबतचं विधान सपाचे आमदार अबू आझमी यांना चांगलंच महागात पडले आहे. अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अबू आझमी यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचे म्हटले होते.
यावरून राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असतानाच ठाण्यात सायंकाळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात वागळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे त्यांच्या राजीनाम्याची पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही खासदार मस्के यांनी सांगितलं.
अबू आझमी काय म्हणाले होते?
अबू आझमींनी म्हटले की, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता. त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते.’
पुढे ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर औरंगजेबची लढाई झाली, ती राज्य कारभाराची होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये कधीच धर्माची लढाई झाली नाही. मी धर्माची लढाई मानत नाही. मी दररोज सकाळी पाहतो की मुस्लिमांना अपमानित करण्यासाठी, त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी कट रचले जातात.
बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार दिसत आहे. पण देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हे मुस्लिमांवर होणारा अन्याय पाहू शकत नाहीत का? जर समाजातील 20 टक्के लोकांसोबत हे घडत असेल तर ते अजिबात बरोबर नाही. जर तुम्ही त्यांना आरक्षण दिले नाही, त्यांना रोजगार दिला नाही तर ते कुठे जातील? ते हिंदू सणांमध्ये वस्तू विकतात म्हणून तुम्ही म्हणता की ते दारू विकतात. हे चुकीचे आहे. द्वेषाची ही परंपरा थांबवा,” अबू आझमी म्हणाले.
हेही वाचा:
मनोज जरांगेंना दारात पाहून धनंजय देशमुखांना अश्रू अनावर ; धाय मोकलून रडले, गावकरीही सुन्न





