ऑगस्ट महिन्यातील PMI निर्देशांक घसरला

नवी दिल्ली – विविध कंपन्यांदरम्यान वाढलेली स्पर्धा, त्याचबरोबर महागाईमुळे उत्पादन खर्चात होत असलेली वाढ, या कारणामुळे भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता ऑगस्ट महिन्यात कमी झाली आहे. या महिन्यात या क्षेत्रातील उत्पादकता कमी होण्याबरोबरच विक्रीही कमी झाल्याची आकडेवारी बाहेर आली आहे.
एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजे पीएमआय ऑगस्ट महिन्यात कमी होऊन 57.5 इतका नोंदला गेला आहे. जुलै महिन्यात हा निर्देशांक 58.1 इतका होता. सर्वसाधारणपणे भारतातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या परचेसिंग मॅनेजर इंडेक्स 54 अंक इतका असतो. या पातळीपेक्षा ऑगस्ट महिन्यातील पीएमआय जस्त आहे. त्यामुळे लवकरच या निर्देशांकात सुधारणा होईल असे समजले जाते.
हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते तर हा निर्देशांक 50 अंकापेक्षा कमी असल्यानंतर हे एक क्षेत्र संकोच पावत असल्याचे समजले जाते. सध्या हा निर्देशांक त्यापेक्षा जास्त आहे. विविध देशांदरम्यान युद्ध चालू आहेत. त्याचबरोबर महागाई जास्त आहे. या कारणामुळे परदेशातून भारतातील कंपन्यांना मिळणार्या ऑर्डरवर परिणाम झाला आहे.
मात्र देशातून मागणी वाढत आहे. त्यामुळे हा निर्देशांक जास्त कमी झाला नाही असे एकूण आकडेवारीवरून दिसून येते. मात्र इतर वेगाने विकसित होणारे देश आणि विकसित देशातील परचेसिंग मॅनेजर इंडेक्सपेक्षा भारतातील हा निर्देशांक जास्त आहे. त्याचबरोबर आता लवकरच देशात आणि परदेशात व्याजदर कपातीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हा निर्देशांक वाढू शकेल.

